कराच्या बिलात ४० टक्के सवलतीचा स्पष्ट उल्लेख नाही   

पुणेकरांमध्ये संभ्रम 

पुणे : महानगरपालिका मिळकत कराची बीले प्रशासनाकडून मिळकत धारकांना पाठवण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये ४० टक्के सवलतीचा स्पष्ट उल्लेख नसल्यामुळे मिळकत धारकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. सवलत मिळाली की नाही हेच समजत नसल्यामुळे नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाला धारेवर धरले असून, सवलतीचा स्पष्ट उल्लेख करण्यात यावा अशी मागणी केली आहे.
 
पालिकेने यंदाच्या वर्षांची मिळकराची बील १ मे पासून पाठवण्यास सुरुवात केली आहे. साडे बारा लाख बिले तयार केली असून, ती संबंधित मिळकतदारांना पोस्टाने तसेच प्रत्यक्ष हातात दिली जात आहेत. राज्य सरकारच्या आदेशानुसार ४० टक्के मिळकत करात सवलत देण्यासाठी पालिकेने पीटी तीन अर्ज सादर करण्याचे आवाहन मिळकतदारांना केले होते. त्यानुसार अनेकांनी पीटी तीन अर्ज सादर केले. परंतु ही सवलत देण्यावरुन पालिकेच्याच कर्मचार्‍यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. त्यामुळे पालिकेकडून पाठविण्यात येणार्‍या बीलामध्ये ४० टक्के सवलतीचा स्पष्ट उल्लेख करण्यात यावा, अशी मागणी केली होती. 
 
त्यानुसार यंदाच्या बीलात सवलत दिल्याचा दावा पालिकेच्या कर आकारणी विभागाने केला आहे. मात्र ज्या बिलांवर उल्लेख केला नाही. त्यांनी ही सवलत दिली की नाही, यावरुन पुन्हा गोंधळ उडाला आहे. आपल्याला ही सवलत मिळते की नाही हे मालमत्ता कर बिल वाचून कळत नाही, त्यामुळे हा गोंधळ आणखी वाढला आहे. खरे तर ही करदात्या नागरीकांची मूलभूत गरज आहे, पण दुर्दैवाने नागरीकांनाच काय पण पालिकेच्या मिळकत कर विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना सुद्धा नुसते बिल पाहून संबंधित बिलात ४० टक्के सवलत दिली गेली आहे की नाही हे समजत नाही. त्यासाठी त्यांनाही पालिकेच्या संगणक प्रणालीमध्ये शोधावे लागते. असे सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी सांगितले.
 
२६ मार्च २०२५ ला पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना पत्र लिहून यंदापासून तरी या मिळकतकर बिलावर  त्या बिलात ४० टक्के सवलत दिली गेली आहे की नाही हे ठळकपणे छापावे. जेणेकरून करदात्या नागरिकांमधील या संबंधीचा संभ्रम संपुष्टात येईल असे कळवले होते. त्यांनी ही मागणी मान्य करुन ४० टक्के सवलती बाबत बिलावर स्पष्ट उल्लेख छापण्यात येईल असे सांगितले होते. मात्र यंदा बिले एक महिना उशीरा पाठवूनही ४० टक्के सवलतीबाबत बिलावर स्पष्ट उल्लेख छापण्यात पालिकेला अपयश आले आहे. खरे तर ही माहिती पालिकेच्या संगणकीय प्रणालीमध्ये आहे, तिथून ती बिलावर छापण्यात काहीही रॉकेट सायन्स नाही , मात्र तरीही हे होऊ शकले नाही हे अनाकलनीय आणि संतापजनक आहे. असेही वेलणकर म्हणाले.
 
मिळकतकरदारांना यंदाची बिल पाठवण्यात येत आहे. ज्या मिळकतदारांना ४० टक्के सवतलत दिल्याचा स्पष्ट उल्लेख बिलांवर करण्यात आला आहे. ज्या मिळकतदाराच्या बिलावर असा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यांना ही सवलत मिळालेली नाही. त्यांनी पालिकेकडे पुन्हा अर्ज करावा. अर्धवट कागदपत्रे, किंवा इतर काही अटींची पूर्तता न केल्याने त्यांना सवलत मिळालेली नसावी.  ज्यांच्या बिलावर ४० टक्के सवलतीचा उल्लेख नाही, त्यांनी पालिकेकडे पीटी ३अर्ज नव्याने करावा.
- पृथ्वीराज बी. पी. अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका
 
आर्थिक वर्ष २०२५-२६ ची मिळकतकर बिले बनविण्याचे काम सध्या पालिकेत सुरू आहे , तेंव्हा किमान यंदापासून तरी या मिळकतकर बिलावर  त्या बिलात ४० टक्के  सवलत दिली गेली आहे की नाही हे ठळकपणे छापावे जेणेकरून करदात्या नागरीकांमधील या संबंधीचा संभ्रम संपुष्टात येईल. अशी वांरवार मागणी पालिकेकडे केली होती. असा कोणताही उल्लेख पालिकेने केला नाही. ज्यांना सवलत दिला आहे, त्या बिलावर उल्लेख केला आहे. तर मग ज्यांना सवलत दिली नाही, त्यांच्या बिलावर ही सवलत नाकारण्यात आली असून पुन्हा अर्ज करावा, असे बिलावर का नमूद केले नाही. ज्याला सवलत मिळालेली नाही, ती व्यक्ती इतरांची बील का तपासत बसेल. सवलत नाकारल्याचे त्याला स्पष्ट समजले तो तात्काळ पालिकेत येवून जी काही पुढील कार्यवाही पूर्ण करेल, पण पालिकेचा अगदी बावळटपणा सुरु आहे. सोपे काम अवघड केले जात आहे. ४० सवलतीची बीलं जर व्यवस्थित तयार करुन पाठवली तर पालिकेला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळू शकणार आहे.
 - विवेक वेलणकर, अध्यक्ष- सजग नागरिक मंच

Related Articles